प्रकाशभाऊ... तुम्हाला RIP तरी कसं म्हणू...
- - - - -
तीन महिन्यांपूर्वी विदर्भात पाऊल ठेवल्यापासून पावलोपावली शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुभवतोय. एकही दिवस असा उजडत नाही की पेपरात आत्महत्यांची बातमी नाही. काऊंटडाऊन सुरु असल्यासारखं... दररोज आहुती पडत आहे. चिता भडकत आहेत. आजची यवतमाळच्या प्रकाश मानगावकरांची आत्महत्या या सर्वांचा कळस गाठत सुुन्न करून टाकणारी...
- - - - -
तीन महिन्यांपूर्वी विदर्भात पाऊल ठेवल्यापासून पावलोपावली शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुभवतोय. एकही दिवस असा उजडत नाही की पेपरात आत्महत्यांची बातमी नाही. काऊंटडाऊन सुरु असल्यासारखं... दररोज आहुती पडत आहे. चिता भडकत आहेत. आजची यवतमाळच्या प्रकाश मानगावकरांची आत्महत्या या सर्वांचा कळस गाठत सुुन्न करून टाकणारी...
शेतरस्त्यालगत झाडाला त्यांनी फाशी घेतली. त्यापूर्वी झाडाच्या एका पानावर ’कर्जासाठी आत्महत्या’ व दुसर्या पानावर ’मोदी सरकार’ ही दोन शब्दांची दोन वाक्ये चुन्याने लिहून झाडाला बांधून ठेवली. दीड लाख रुपये कर्ज आणि आशेचा किरणच नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रावर पत्नीसह आठ दिवस चकरा मारून ते मेटाकुटीला आले होते. घर व उदरनिर्वाहासाठीच्या छोट्या मालवाहू वाहनासाठी घेतलेले खासगी कंपनीचे कर्ज फेडण्याच्या चिंतेने त्रस्त झाले होते. कर्ज फेडण्यासाठी काही दिवसांपूर्वीच पाच पैकी अडीच एकर जमीन विकली होती.
नापिकीमुळे कर्जबाजारीपणा, त्यात वाढती महागाई, कर्जफेडीचा तगादा यामुळे प्रकाश बेजार झाले होते. अशी अवस्था भोगत असलेले ते एकटे नाहीत. कारणं अनेक आहेत. प्रत्येक हात वेगवेगळ्या दिशांकडे, नेत्यांकडे, विरोधकांकडे, सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवतो. फार थोडे हात शेतकऱ्यांच्या पाठीवर विसावून त्याला अडचणीतून वर येण्यासाठी बळ देतात, उभारी देवू पाहतात.
अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन विदर्भातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशिल आहे. धोरणात्मक बदल, पाठबळ, तंत्रज्ञान प्रसार, निराशेतून बाहेर काढून जगणं सन्मान्य व शाश्वत करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सर्वोतोपरी योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे, पण रोज होणाऱ्या आत्महत्यांनी काळीज तुटतेय आणि तुटपुंजेपणाची भावनाही बळावतेय. आभाळ फाटलंय, थिगळ तर लावावच लागेल. पुढे येतील तेवढे हात कमीच आहेत. मित्रांनो... आपापल्या परिने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करुया राज्यभरातील शेतकऱ्यांना पाठबळ व उभारणी देण्याचा. बातम्या वाचून हळहळण्याच्या पलिकडे जावून कृतीशील होण्याचा...
(गुंड, भ्रष्टाचाऱ्यांच्या बातम्या देताना अनेकदा आहोजाहो घालून गोंजारणारी माध्यमे शेतकऱ्यांची बातमी मात्र एकेरीत लिहीताहेत. हे आणखी टोचणी लावणारं. त्यातही आमचे पुण्या मुंबईचे काही दीड शहाणे इस्रायलचे व कुणाकुणाचे उदाहरण देत निगेटिव्ह बातम्या (म्हणजे आत्महत्या वगैरे) न छापता फक्त यशोगाथाच छापा म्हणतात सगळ्या पेपरांमध्ये पहिल्या पानांवर तेव्हा त्यांच्या वैचारीक लक्तरांचीही लाज वाटते माणूस म्हणून)
(छायाचित्र - इंटरनेटवरुन साभार)

No comments:
Post a Comment