विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचे, आचार आणि विचाराचेही अनेक पदर आहेत. हळूहळू एकेक उलगडतोय. महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागातील शेतकरी आणि विदर्भातील शेतकरी यांची तुलनाच होवू शकत नाही. जे भेटतं ते वेगळंच आणि कमालीचं रंजक असतं. 2014 सालच्या कृषी पुरस्कारांची घोषणा कृषी विभागाने 2018 साली केली त्यात हे नाव आलं... सचिन सारडा, मु.पो. शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशिम.
सचिन सारडांनी कुटुंबाच्या पारंपरिक शेतीचा चेहरामोहरा हळद व केळी उत्पादनातून बदलून टाकला आहे. शेती खरंच चांगली आहे मी बरिच माहीती घेतली, क्रॉस व्हेरिफिकेशनही केलं. क्रॉस व्हेरिफिकेशनची गरज अशी वाटली की हा माणूस एकेका शब्दाचा हिशेब ठेवतो आणि त्या शब्दाचा फॉलोअपही प्रचंड घेतो. मला तर वैतागून टाकलं साहेबांनी. बरं काम चांगलं आहे आणि जोडीला प्रसिद्धीची आवडही आहे, त्यातून स्थानिक पत्रकारांशी मैत्री आहे त्यामुळे त्यांच्या वावरातलं पान हललं तरी बातमी येते हे त्यांचे वॉट्सअप स्टेटस पाहून पटतं.
त्यांचे कौशल्य असे की कुठकुठपर्यंत ते पोचतात, फॉलोअप असतात. सरासरी दर महिन्याला किमान दोन तरी पुरस्कार त्यांना मिळत असावेत असं माझं गेल्या सहा महिन्याचं निरिक्षण आहे. जे काही आहे ते खासीयत आहे या मानसाची. वेगळंच रसायन आहे. प्रसिद्धीतला फोलपणा कोळून पिलेल्या माणूस जेव्हा हे असं रसायन पाहतो तेव्हा अनेक गोष्टी खटकतात. पण त्यांची ही धडपड पोकळ नाही हे त्यांच्या शेतीतले अपडेट पाहील्यावर कळतं आणि मग प्रसिद्धीचा सोस दुर्लक्षित करुन त्यांच्यातल्या शेतकऱ्याचं मला खरंच कौतुक वाटतं...
सारडा कुटुंबाची दहा एकर बागायती शेती आहे. त्यांचे बीकॉम शिक्षण झाले आहे. दोघा भावांपैकी सतीश हा भेटवस्तूंच्या विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सांभाळतो. शेतीची संपूर्ण जबाबदारी सचिन पाहतात.
नोकरीच्या मागे न लागता वडिलांनंतर सचिनने शेतीलाच सर्वस्व मानले आहे. कृषी विभाग आणि करडा कृषी विज्ञान केंद्राच्या ते सातत्याने संपर्कात असतात. वाशिम जिल्ह्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन शेतीत काय बदल करता येतील, याच्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो.
पूर्वी सारडा कुटुंबिय सोयाबीन, हरभरा आणि तूर अशी पिके घेत होते. सचिनने या पिक पद्धतीत बदल केला. सोयाबीनमध्ये तुर आंतरपिक घेऊन दोन्ही पिकांचे चांगले उत्पन्न घेतले. त्यानंतर ते हळद पिकाकडे वळले. सरी वरंबा पद्धतीने २०१०-११ मध्ये दोन एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली. त्यातून त्यांना 40 क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन झाले. हिंगोली बाजारपेठेत त्यास आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानंतर तातत्याने ते हळदीचे यशस्वी उत्पादन घेत आहे. आता हळद हेच त्यांचे मुख्य पिक झाले आहे. एकरी 30 क्विंटल उत्पादनाचा उच्चांक त्यांनी शिरपूरमध्ये प्रस्थापित केला आहे.
हळदीला चांगला बाजारभाव मिळविण्यासाठी ते हिंगोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. हळदीच्या दराची माहिती घेतात आणि दर कमी असल्यास वाशीम येथील गोदामामध्ये हळद तारण ठेवून आवश्यक कर्ज रक्कम उचलतात.
केळी उत्पादनातही त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. झाडांची दीड एकरात 1700 संख्या, सात बाय सात फूट अंतरावर लागवड. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर, ठिबकच्या साहाय्याने दर महिन्याला शिफारसीत खतांची मात्रा ही त्यांच्या केळी उत्पादनाची वैशिष्ये आहेत. 2011-12 या वर्षात दीड एकरावर त्यांनी केळीची लागवड केली होती. काटेकोर पिक व्यवस्थापन करुन त्यांनी केळीचे दर्जेदार उत्पादन घेतले आणि दरही चांगला मिळवला. सरासरी दर वर्षी ते केळीपासून दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
सारडा यांची संपूर्ण शेती ठिबक व तुषार सिंचनाखाली आहे. शेतात गांडुळ खत उत्पादक प्रकल्प सुरु करुन करून त्यांनी सेंद्रिय शेतीचाही अवलंब केला आहे. गावातील शेतकरी गटातही ते सक्रीय आहेत. दुग्धव्यवसाय, शेडनेटमधील भाजीपाला उत्पादन आदी विषयांचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सारडा यांना 2014 सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.



No comments:
Post a Comment