भावांनो... नाद नाय करायचा... कसा लाल जळजळीत ठसका आहे की नाही. पण टेन्शन नॉट. ही मिरची दिसायला जेवढी जहाल आहे तेवढी झणझणीत तिखट नाही. तुम्ही विदर्भात आलात आणि भिवापुरची मिरची चाखली नाही किंवा इथल्या मिरचीच्या खळ्यांचा फिल घेलता नाही तर काय पाहिलंत साला. मी बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवून होतो, काल मनसोक्त खळी पालथी घातली आणि आस्वादही घेतला.
धुळे व नंदुरबारलाही मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण भिवापुरच्या वावरंच्या वावरं किंवा खाचरंच्या खाचरं पसरलेल्या मिरचीच्या खळ्यांची व ढिगांची सर त्यांना नाही. खळी पाहून भिवापूर स्टॅडवर जायचं आणि खास भिवापूरी भजी चा आस्वाद घ्यायचा अर्थात जोडीला तळलेली भिवापूरी हिरवीगार मिरची. पाहून धडकी भरते मात्र पेरंभराचा घास घेवूनही जिभेला झणझन करत नाही. आणि मग तुम्ही वाह वाह करत अनोखी चव चाखत राहत... बघा संधी मिळाली किंवा मिळवता आली तर आस्वाद घेवून पहाच...
विदर्भातील ठेचा सर्वदूर प्रसिद्ध आहे. या ठेच्यातील महत्वाचा घटक म्हणजे भिवापूरची लाल मिरची. नागपूरच्या दक्षिणेला 60 किलोमिटरवर भिवापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. इथल्या मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला असलेला लाल भडक रंग आणि न झोंबणारा तिखटपणा. “स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया” च्या अभ्यासानुसार या मिरचीचा तिखटपणा भारतातील इतर महत्त्वाच्या तिखट मिरच्यांपेक्षा कमी आहे. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे तिला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेला आहे.
मिरचीमध्ये कॅपसेसिनॉइड्स हे रसायन जितक्या अधिक प्रमाणात तितका त्यातील तिखटपणा अधिक असतो. या मिरचीचा रंग जास्त लाल आहे. या रंगाचे प्रमाण किंवा निकष निश्चित करण्यासाठी अमेरिकन रंगशास्त्र प्रणालीचा वापर केला गेला. याला आस्ता व्हॅल्यू असे म्हणतात. (ASTA American Spice Trade Association). तिखटपणा कमी असल्याने जास्त खावूनही ‘ॲसिडिटी’ होत नाही. दिसायला लाल भडक पण तिखटाला कमी अशा गुणधर्मांमुळे या मिरचीला परदेशातून मोठी मागणी आहे. रंगाच्या आणि तिखट पणाच्या बाबतीत गुंटूर, ब्याडगी या मिरच्यांच्या वाणांपेक्षा भिवापूर मिरची सरस ठरते. भिवापूर मिरची पावडरला किडी- रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने ती एक वर्षापर्यंत साठवताही येते.
ही मिरची पक्व होण्यास इतर मिरच्यांपेक्षा ३० ते ४० दिवस जास्त घेते. त्यात जोडीला मजुरांची कमतरता, मिरचीच्या शेतात किंवा खळ्यावर दिवसभर ठसकत काम करणे म्हणजे मजुरांसाठी अवघडच. तिखट कमी आहे म्हणून ती ठसका द्यायला थोडीच विसरते. त्यात बदलते हवामान, घटता पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या अन्य पिकांकडे धाव घेतल्याने ऐकेकाळी देश परदेशात अधिराज्य गाजवणाऱ्या भिवापूर मिरचीला उतरती कळा लागली होती. गेल्या काही वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर पोचलेल्या भिवापूर मिरचीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.
भिवापूरचे प्रगतिशील शेतकरी डॉ. नारायण लांबट, अन्य शेतकरी, कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेतील अधिकारी श्रीमती नलिनी भोयर यांनी भिवापूर मिरचीला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. त्यांना त्यासाठी या विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांची मदत झाली. विविध वैशिष्ट्यपूर्णी बाबींचे मुल्यांकन केल्यानंतर भिवापूरच्या मिरचीला जीआय प्राप्त झाला असून त्यामुळे या मिरचीच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब होवून हक्काची बाजारपेठ विकसित होण्यास मदत झाली आहे. कृषी विभाग व शेतकरी गटांच्या प्रयत्नामुळे मिरचीचे क्षेत्र 500 हेक्टरपर्यंत वाढले आहे.
भिवापूर तालुक्यातील जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असून, तेथील जमीन सूक्ष्म मूलद्रव्यांनी समृद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोह, मंगल व तांबे यांची उपलब्धता जास्त असल्याने मिरचीला अधिक लाल रंग प्राप्त होतो. मिरचीसाठी उष्ण, आर्द्र वातावरणाची व स्वच्च सूर्यप्रकाशाची गरज असते. भिवापूर तालुक्यात असेच वातावरण आहे. या भागात १२५० ते १३५० मी.मी. पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामात मिरचीला मुबलक पाणी मिळते. या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीतून इथल्या मिरचीत विशेष गुणधारणा झाली आहे.


No comments:
Post a Comment