Monday, January 1, 2018

नाग नदीकाठी, फुटपाथवर...

आज भर दुपारी त्या फुटपाथवर चुल पेटलीये. तसा सुनसानच असतो गार्डनमधील झाडांच्या अतिक्रमीत सावल्यांत पडलेला निपचित. बाजूला राष्ट्रीय शिस्तित उभ्या असलेल्या बीएमडब्लू, मर्सडिझच राखण करत. सात चिल्ली पिल्ली पोरं, त्यातही मुलीच अधिक, चपाती नावाची भाकर कुरतडत लोळत पडलीत थोरामोठ्यांच्या पायधुळीत.
पाच कळकटलेल्या कुपोषित बाया, गव्हाच्या भाकरी लाटताहेत, पाणी पिताहेत त्यांच्याहून कमी कळकटलेल्या ड्रम्पातून. तीन गडी चुलीभोवती कोंडाळं करुन लाकडं सारताहेत चुलीत. या पंधरा जणांच्या जगण्याचा एकूण रोजचा खर्च १०० रुपयांहून अधिक नसावा बहुतेक. एक अर्वाचिन तवा, वितभर व्यासाची प्राचिन परात आणि शतकानुशतके खंगल्यासारखे देह व एका तशाच पिशवीत रोजच्या उत्तरक्रियेचे साहित्य यापलिकडे काही नाही. कुठून कुठून गोळा केलेली चिंधकं अंगावर, अंगाखाली घेवून आणि निरुपयोगी तिथंच तुमच्या माझ्या जगण्यावर फेकून ते जगताहेत रोजच असं बहुतेक.
मला त्यांच्या जवळ जायचं, चौकशी करायचं वा तुम्हाला दाखवायला फोटो काढायचं धाडस नाही. ना जाणो आपल्याच कुठल्या भागातले शेतकरी निघाले देशोधडीला लागलेले तर अवघड होवून बसायचं सगळंच. नसावेत ते शेतकरी कोणत्याच जगातले कुठलेच. नसतीलच. नाहीतच. असं मनाचं मनात ठरल्यावर काळजानं डोळे झाकले की बरं पडतं कोडग्यानं दृष्टीआड सृष्टी करुन पोटार्थी जगायला. त्यांनी तरी दुसरा काय चालवलंय म्हणा...
वापरुन झालं की फेकून द्यायचं, ही सुद्धा प्राचिन संस्कृतीच आहे युनिव्हर्सची. राजस्थानात पाहिलेलं देवाला चिंधकं वाहताना लोकांना. इथले हे देवही चिंधकं स्विकारुन त्यांचे वर्गिकरण करुन काही जगून, काही भोगून चिंधकंच भिरकवताहेत जिंदगीवर. हे निर्माल्य येता जाता वाजवत राहतंय कर्कश घंट्या मनाच्या गाभाऱ्यात. घणाणत्या मुक आक्रोशात मी पाहत राहतो नजर फिरवून नाग बरबटलेल्या अवस्थेत वाहताना काळजाच्या कवटीत वस्तूस्थितीचे सुळ खुपसून.

No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...