Tuesday, January 9, 2018

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी


काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गाडीच्या पुढच्या बाजूला स्कुटीवर दोन मुली थांबलेल्या. त्यांच्या पाठीमागे अजून दोन स्कुटी व त्यावरही मुली डबलसीट. माझ्या उजव्या बाजूला दुभाजकावर दोन मुलं हातात फुगे घेवून उभी होती विकायला. 

या दोन पोरांतलं मोठं पोरगं आठवी नववीच्या वयाचं असेल... एक दर्द भरं गाणं म्हणत होतं दुसऱ्याला खिजवत खिजवत. दर्द से अपना रिश्ता तो पुराना है... त्यामुळे गाणं ओळखीच नसलं तरी आवाजातली कशीश भारी वाटत होती. एमपी युपी स्टाईलनं त्याचं आपलं चाललं होतं. तेवढ्यात मोठ्या पोऱ्याच्या लक्षात आलं सिग्नल लागलेला आणि त्यानं आपला मोर्चा थांबलेल्या लोकांकडे वळवला आणि माझ्या कारच्या पुढून मुलींकडे गेला.

चौकातलं मार्केटिंग हा सर्वच मेट्रो शहरांतला मोठा विषय. चौकाचौकात काही ना काही वस्तु विकल्या जातात सिग्नल लागल्यावर. कधी दयेनं, कधी कौतुकानं, कधी भिक मागण्यापेक्षा ही लोकं काहीतरी काम करताहेत या समाधानानं, कधी कनवेनं, कधी आवड तर कधी गरज म्हणून या वस्तू विकत घेतल्या जातात मोठ्या प्रमाणात. यातून सिग्नल मार्केटिंगचं मोठं विश्व उभं राहीलंय, जगात कुठंच मिळणार नाहीत अशा अनेक वस्तू सिग्नलला विकत मिळतात म्हणून माझं अनेकदा हे ह्युमन बिहेविअर स्टडीचं ठिकाण चालू चालूतलं. त्यामुळं माझं या दोन्ही पोरांवर बारिक लक्ष होतं.

मॅडम लो ना... लोना म्हणत ते पोरगं फुग्याची दोरी बांधलेली स्ट्रॉ पेक्षा मोठी प्लॅस्टिकची नळी सरळ त्या स्कुटी चालवणाऱ्या मुलीच्या छातीला टोचत होतं. आत्तापर्यंत त्या पोरांकडं सहानभुतीनं, त्याच्या आवाजातल्या दर्दी कशिशीनं मुलांविषयी मनावर साय जमा झाली होती. माझीच नजर तर दुषित नाही ना असंही वाटलं क्षणभर... पण तेवढ्यात त्या मुलीनं त्या पोऱ्याकडे अतिशय रागाने पाहत ती फुग्याची नळी हातानं झिरकाडली तसा माझ्या तळपायाची आग मस्तकात पोचली. साला ये तो साप निकला... सिग्नल सुटण्याच्या बेतात होता आणि माझ्या विरुद्ध बाजूला हे सुरु होतं. त्या मुलीने झिरकडल्यावर हा त्या पाठीमागच्या मुलींकडे गेला.

या वेळी त्याचा तो स्ट्रॉ जरा बाजूला होता हवेत. तशाही अवस्थेत पहिल्या मुलीला चुकून लागला असेल तो स्ट्रॉ... आपलाच गैरसमज झाला असेल असा विचार मनाला चाटत होता... तोच तो पोरगा पुन्हा आपल्या औकादीवर आलाच. त्यानं अतिशय झटकन तो स्ट्रॉ त्या मुलीच्या हॅडल धरलेल्या हाताच्या घालच्या बाजूने सरकवून पुन्हा तिच्या छातीला टोचायला सुरवात केली... मॅडम लो ना... लो ना... आता मात्र टाळकं सटकायची वेळ आलेली.. तिनंही झरकाडलं आणि तेवढ्यात सिग्नल सुटला... हा गडी पुन्हा मागं फिरला... या वेळी त्याच्या बत्तीशीत छद्मी हास्य होतं. क्षणभर वाटलं गाडी अशीच बाजूला घ्यावी आणि त्याच्या श्रीमुखात चार भडकावून द्याव्यात खणाखन... पण वेळ कुणाला होता. ना त्या मुलींना.. ना मला...

काही क्षणांचा प्रसंग, कोणी झिरकाडून निघून जातं, कुणी माझ्यासारखं पाहून हात चोळीत धुमसत निघून जातं. आपल्या लेखी वेळ टळलेली असते. पण तुमच्या आमच्या या वागण्यातून नकळत अशा वखवखलेल्या गिधाडांना पुढचं सावज शोधण्याचं आणि नवा खेळ खेळण्याचं बळ मिळत राहतं. मग ठिकाण नागपूरचा हा सेंट्रल चौक असेल मुंबईतलं एखाद्या वर्तमानपत्राचं ऑफिस असेल किंवा दिल्लीतला एखादा अंधारा कोपरा. आता सहन करणं खरंच बास झालं राव. जिथल्या तिथे हिशेब चुकता करायलाच हवा. विषवृक्ष पोसण्याआधीच त्याच्या मुळ्या छाटलेल्या बऱ्या...




Monday, January 8, 2018

लाल मिरची भिवापुरची




भावांनो... नाद नाय करायचा... कसा लाल जळजळीत ठसका आहे की नाही. पण टेन्शन नॉट. ही मिरची दिसायला जेवढी जहाल आहे तेवढी झणझणीत तिखट नाही. तुम्ही विदर्भात आलात आणि भिवापुरची मिरची चाखली नाही किंवा इथल्या मिरचीच्या खळ्यांचा फिल घेलता नाही तर काय पाहिलंत साला. मी बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवून होतो, काल मनसोक्त खळी पालथी घातली आणि आस्वादही घेतला.

धुळे व नंदुरबारलाही मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण भिवापुरच्या वावरंच्या वावरं किंवा खाचरंच्या खाचरं पसरलेल्या मिरचीच्या खळ्यांची व ढिगांची सर त्यांना नाही. खळी पाहून भिवापूर स्टॅडवर जायचं आणि खास भिवापूरी भजी चा आस्वाद घ्यायचा अर्थात जोडीला तळलेली भिवापूरी हिरवीगार मिरची. पाहून धडकी भरते मात्र पेरंभराचा घास घेवूनही जिभेला झणझन करत नाही. आणि मग तुम्ही वाह वाह करत अनोखी चव चाखत राहत... बघा संधी मिळाली किंवा मिळवता आली तर आस्वाद घेवून पहाच...

विदर्भातील ठेचा सर्वदूर प्रसिद्ध आहे. या ठेच्यातील महत्वाचा घटक म्हणजे भिवापूरची लाल मिरची. नागपूरच्या दक्षिणेला 60 किलोमिटरवर भिवापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. इथल्या मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला असलेला लाल भडक रंग आणि न झोंबणारा तिखटपणा. “स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया” च्या अभ्यासानुसार या मिरचीचा तिखटपणा भारतातील इतर महत्त्वाच्या तिखट मिरच्यांपेक्षा कमी आहे. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे तिला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेला आहे.

मिरचीमध्ये कॅपसेसिनॉइड्स हे रसायन जितक्या अधिक प्रमाणात तितका त्यातील तिखटपणा अधिक असतो. या मिरचीचा रंग जास्त लाल आहे. या रंगाचे प्रमाण किंवा निकष निश्चित करण्यासाठी अमेरिकन रंगशास्त्र प्रणालीचा वापर केला गेला. याला आस्ता व्हॅल्यू असे म्हणतात. (ASTA American Spice Trade Association). तिखटपणा कमी असल्याने जास्त खावूनही ‘ॲसिडिटी’ होत नाही. दिसायला लाल भडक पण तिखटाला कमी अशा गुणधर्मांमुळे या मिरचीला परदेशातून मोठी मागणी आहे. रंगाच्या आणि तिखट पणाच्या बाबतीत गुंटूर, ब्याडगी या मिरच्यांच्या वाणांपेक्षा भिवापूर मिरची सरस ठरते. भिवापूर मिरची पावडरला किडी- रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने ती एक वर्षापर्यंत साठवताही येते.


ही मिरची पक्व होण्यास इतर मिरच्यांपेक्षा ३० ते ४० दिवस जास्त घेते. त्यात जोडीला मजुरांची कमतरता, मिरचीच्या शेतात किंवा खळ्यावर दिवसभर ठसकत काम करणे म्हणजे मजुरांसाठी अवघडच. तिखट कमी आहे म्हणून ती ठसका द्यायला थोडीच विसरते. त्यात बदलते हवामान, घटता पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे  इथल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या अन्य पिकांकडे धाव घेतल्याने ऐकेकाळी देश परदेशात अधिराज्य गाजवणाऱ्या भिवापूर मिरचीला उतरती कळा लागली होती. गेल्या काही वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर पोचलेल्या भिवापूर मिरचीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.


भिवापूरचे प्रगतिशील शेतकरी डॉ. नारायण लांबट, अन्य शेतकरी, कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेतील अधिकारी श्रीमती नलिनी भोयर यांनी भिवापूर मिरचीला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. त्यांना त्यासाठी या विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांची मदत झाली. विविध वैशिष्ट्यपूर्णी बाबींचे मुल्यांकन केल्यानंतर भिवापूरच्या मिरचीला जीआय प्राप्त झाला असून त्यामुळे या मिरचीच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब होवून हक्काची बाजारपेठ विकसित होण्यास मदत झाली आहे. कृषी विभाग व शेतकरी गटांच्या प्रयत्नामुळे मिरचीचे क्षेत्र 500 हेक्टरपर्यंत वाढले आहे.

भिवापूर तालुक्यातील जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असून, तेथील जमीन सूक्ष्म मूलद्रव्यांनी समृद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोह, मंगल व तांबे यांची उपलब्धता जास्त असल्याने मिरचीला अधिक लाल रंग प्राप्त होतो. मिरचीसाठी उष्ण, आर्द्र वातावरणाची व स्वच्च सूर्यप्रकाशाची गरज असते. भिवापूर तालुक्यात असेच वातावरण आहे. या भागात १२५० ते १३५० मी.मी. पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामात मिरचीला मुबलक पाणी मिळते. या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीतून इथल्या मिरचीत विशेष गुणधारणा झाली आहे.


Monday, January 1, 2018

जिजाऊ सृ्ष्टी - सिंदखेडराजा, बुलडाणा

शतकं उलटली तिची पावलं तिथं उमटून... अजूनही ती जागा, लखोजीराव जाधवांचा तो वाडा, ते गाव, तो परिसर तिच्या अस्तित्वानं भारलेलं आहे. तिची पावलं स्वातंत्र्याची पावलं ठरली. ती चालत गेली विदर्भापासून कोकणापर्यंत आणि ही अवघी भूमी गोतावळ्यासह पिढ्यानपिढ्यांच्या दास्यातून मुक्त झाली.
तिनं एक शिवाजी घडवला, घराघरात शिवाजी घडला. महाराष्ट्र देश उभा राहीला. ती स्वराज्याचं खत, पाणी झाली. दोन छत्रपती, लोककल्याणकारी सम्राट तिने एकहाती घडवले. तिच्या एका समर्पित आयुष्यानं अगणित आयुष्य सार्थकी लागली. खरीखुरी स्वातंत्र्यदेवता, राजमाता जिजाऊंची पायधुळ कपाळी लागली आणि सार्थक झालं.





लोणार सरोवर - बुलडाणा


लोणार सरोवर, प्रति खजुराहो मंदीरसमुह आणि सुप्रसिद्ध विहीर... सकाळ सकाळ नाष्त्याला अजून काय पाहिजे. भुगोलाच्या पुस्तकाची अनुभुती जगताना मजा येतेय. लोणार चं पहिलं दर्शन उर न् डोळे भरवणारं होतं. मंदिरानं खजुराहोचा पुनर्प्रत्येयाचा आनंद दिला तर विहिरीनं आत आत आत आत्म्याच्या डोहाचा ठाव...

कितीतरी वेळ बसून होतो तिथल्या विरव शांततेत मीच माझ्यात हरवलेला. सरोवराच्या काठावर बाभळीच्या सावलीखाली बसून त्याच्यावर नजर खिळवून ध्यानस्त होण्याचा मोह ओमकारावर भागवला.

रात्री ढग नसते तर मस्त टिप्पूर चांदणं पडलेलं लोणार पहायला भेटलं असतं... परातीत चंद्र बघतात तसं. इथं घमेलं रेडी आहे, त्यात खारं पाणी भरलेलं आहे, देरी आहे अवकाश चंद्र चांदण्यांनी भरण्याचं आणि त्याचं प्रतिबिंब सरोवरातून परावर्तित होण्याचं... कानावर मोरांचे गायन, डोळ्यांत सरोवराचा पँनोरमा व्हू आणि आख्खी बुब्बुळं खारावलेल्या चांदण्यांनी भिजलेली...

बरंच काही राहीलंय, बरंच काही निसटलंय ओंजळीतून मनाच्या बोटांच्या फटीतून नकळत कवडशासारखं... पुढच्या वेळेसाठी !





कारंजा लाड - वाशिम


29 जुलै 2017
कारंजा (लाड). स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इथल्या नवाबाला, या गावाला दोन वेळा लुटलेलं. कधी हिंदु, कधी मुस्लिम तर कधी जैन धर्मीयांच्या धर्मसशक्तीकरणाचे केंद्रबिंदु राहीलेले चार वेशींचे तीन तलावांमध्ये वसलेले वाशिम जिल्ह्यातील टुमदार गाव. कारंजा काळविट अभयारण्य त्याच्या लौकिकात आणखी भर घालतंय.
बराच फिरलो उभा आडवा, पण काळविट काही दिसलं नाही... आता सगळीकडंच गवत वाढलंय त्यामुळं त्याला १० वाटा मोकळ्या, आणि त्यातूनही ते काही देव नाही, भाविकांसाठी एका जागी बसून रहायला. रूषी तलाव मस्त आहे. आणि त्याच्या काठावरचं मंदीरही. एरवी म्हटलो असतो... जास्त लाडात यायचं काम नाही. पण आता लाडात (कारंजा) यायला हरकत नाही... 




शिंगणापूरचा देश, वेश अन् भेश - अमरावती


देश बदलला (आपल्याकडं देश = जिल्हा) की फक्त वेश न् भेश नाही बदलत, खाण्यापासून कामापर्यंत सगळंच बदलतं मल्टिडायमेन्शनली.
वाशिममधून अमरावतीत आलो शिंगणापुरला. गाडी एका हॉटेलपुढं लावली, हॉटेल गार होतं. म्हणून पुढच्या गरम हॉटेलात गेलो. मनात सारखी शंका कणकणत होती, गाडी सेफ राहील ना...
गरम हॉटेलच्या मालक कम आचारी कम वेटर कम सफाई कर्मचाऱ्याला तरी विचारलंच.. गाडी सेफ राहील ना. तो काही होणार नाही म्हणाला आणि मी बिनधास्त पाण्यावर ताव मारला. इथं प्रत्येक डिशसोबत कढी मिळते. आमच्या मंचरचा कढीवडा फेमस आहे. पण इथं... कढीवडा, कढीपँटिस, कढीभजी सगळं कढीमय.
खाद्ययात्रा आटोपून बाहेर आलो तर बुटेचं पुढचं चाक जागी बसलेलं. असं कसं होऊ शकतं लगेच ? आता तर टंच होती... मग त्या हॉटेलवाल्याला विचारलं, हवा गेल्याचा आवाज आला काय... तो नाही म्हणाला. मग बाजूच्या हॉस्पिटलमध्ये अँडमिट केली. गँरेजमध्ये डॉक्टर भेटला तो ही असा इब्लिस... चाक न खोलता पंक्चर काढणारा. काढली गड्यानं पंक्चर. टायरात काहीच नाही सापडलं... गप ४० रू दिले नं मांड ठोकली.
(29 जुलै 2017)





पृथ्वीच्या गर्भापर्यंत


पृथ्वीच्या गर्भापर्यंत गेलेला रस्ता... त्यावरून अप टू इनफिनिटी डुगडुगत जाणारी बुलेट. कानावर रुमाल, डोळ्यावर गॉगल, पावसापाण्याचं जँकेट आणि बुलेटशी वेवलेंथ जुळलेलं पॉझिटिव्ह माईंड... पाठीवरल्या ट्रेकिंग सँगमध्ये आख्खं ब्रम्हांड.
- - - -
जालना ते बुलडाणा जिल्ह्यातील रात्री चा प्रवास लाजिरवाना होता. अंधार पडायला लागला की टमरेल / चिंपाट / डबडं घेवून स्रियांची रस्त्याच्या कडेला शौच्चास बसायची लगबग. अंधार वाढत जाईल तशी गावशिवारांच्या आसपास ही परिस्थिती वाढत जाते. मग बुलेटच्या एक्स्ट्रा हेवी लाईटची माझी मलाच लाज वाटायची. त्या बसलेल्या असायच्या सराईतपणे तशाच... मलाच लाईट बंद करून गाडी चालवावी वाटायची इनफिनिटीपर्यंत...
लोणारमध्ये भर दिवसा कडाक्याच्या उन्हात गल्लीबोळातून फिरताना तर हे चित्र अधिकच बिकट, बाया घरातली चिल्लीपिल्ली रस्त्याकडंला आखरवायला घेवून आलेल्या. हागत्या पोराकडं जरा दुर्लक्ष करून मला वाटं लावायच्या आणि मग निवांत पिलावळ सांभाळायच्या... हे खरंच थोर आहे.
- - - -
किनगाव राजा च्या पुढून लोणार ला जायला दोन रस्ते आहेत. एक लिंगा मार्गे शॉर्टकट व दुसरा सुलतानपूर मार्गे बराच लांबचा ववंडा... अंधार पडल्यावर प्रत्येकजण आतल्या रस्त्यानं जावू नका, सुलतानपूरहून जा असं आग्रही सांगू लागला. अगदी माझा लोणारमधील दोस्ताचंही तेच पालूपद... एक जण म्हणाला बुलेट आहे म्हणल्यावर कोण काय करत नाय, आवाजानंच बाजूला पळत्याल. मला उलगडा झाला नाही, पण ती वेळही नव्हती गुंता सोडवायची. सुलतानपूर जिंदाबाद.
- - - -
लोकांना अज्ञान प्रकट करायची खुप घाई असते. ही घाई वाटसरुंना खुळं करून टाकते. मी अनोळखी ठिकाणी बाय ऑल मिन्स रुट फिक्स केलेला असतो. पण कधीकधी स्थानिक मंडळींवर विश्वास टाकावा लागतो. टाकला आणि सिर्सी वरून सरळ भिवापूरला जाण्याऐवजी वर उमरेडला जावून पुन्हा खाली भिवापूरला आलो... मँपवर २० किलोमिटर जास्त भरलं तरी खराब रस्त्यामुळं ऐन दिवेलागणीच्या वेळचा फुल मोसममधला एक तास जास्त खाल्ला त्यानं. मग भिवापूरपासून गडचिरोलीपर्यंत धुराड्यात डोळ्यांची खाचाडं झाली.
- - - -
नद नद्या नाले झाडं झुडपं जनावरांना पोटात घालून खदखदा वाहिल्यानंतर गेल्या आठवडाभरात गडचिरोली शांत झालीये. पूर्वपदावर आलीये. कडक ऊन पडलंय आणि दुरुस्तीच्या रस्त्यांवर फुफाट्याचं साम्राज्य उधळतंय.
मावळतीनंतर काही क्षणात घनगर्द झालेल्या आभाळात चंद्र दोनचार चांदण्यांना हाताशी धरून गणाला उभा राहीला. अाज गणाला रणी आणिला.... पठ्ठेबापुराव सुरू झाले. मग हळू हळू एकेक तारा फेट्याचा तुरा सावरत गणात घसा खाकरू लागला. चांदण्या गवळणींची लगबग चाललेली. मथूरेच्या विमानांचा तप्पास नव्हता नभांगणात, पण गवळणी नटलेल्या नव्या नवरीसारख्या. वर हा सर्व साग्रसंगित सोहळा सुरू असताना खाली रस्त्याच्या दुतर्फा भात खाचरं कनातीच्या प्रकाशात प्रेक्षक म्हणून आपलं अस्तित्व दावत होती. वेडी पाखरं मध्येच एखादी शिळ घालायची अन् त्या शिळेवर एखादी अल्लड चांदणी गवळण जीव ओवाळून टाकायची... बुलेट धुडधुडत होती इनफिनिटीपर्यंत...

शेतकरी मनिष शेळके - मेहकर, बुलडाणा

माजी जिल्हा परिषद सदस्य, खानावळ किंवा हॉटेल व्यवसायिक आणि चांगला शेतकरी म्हणून जेव्हा मनिष शेळके यांच्याशी परिचय झाला तेव्हा मी सगळ्या कसोट्या लावून मोकळा झालो. मला या मानसाचा प्रामाणिकपणा जास्त आवडला... जे आहे ते कोणताही आडपडदा न लावता स्पष्टपणे सांगतात... त्यांचा प्रवास भलताच रंजक आहे. 

शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. अनेकांनी ते अनेक प्रकारे केले आहे. नोकरदार शेतकरी, व्यवसायिक शेतकरी, राजकारणी शेतकरी, संडे फार्मर, नुसता शेतकरी वगैरे वगैरे वगैरे. या सर्वात राजकारणी शेतकरी आणि व्यवसायिक शेतकरी हे दोन केडर अनेकदा टिकाटिप्पणीचे आणि त्यातही हे लोक काय काळ्याचे पांढरे करायला शेती दाखवतात... अशा अर्थाचे शेरेबाजीग्रस्त असते. त्यामुळे मी शेळकेंच्या बाबतीत जास्तच चौकस होतो. पण जेवढा खोलात घुसत गेलो तेवढी त्यांची शेतीतली प्युरीटी स्पष्ट होत गेली आणि मग अॅग्रोटेक्निकल वेवलेंथ जुळायला अडचण आली नाही.

शेतीत भांडवलाशिवाय काही होत नाही. आणि ती जर खडकाळ पडीक असेल तर मग काहीच सोय नाही. शेळके कुटुंबाची वडिलोपार्जित फक्त एक एकर शेती होती. मनिष यांचे वडील सुखदेव शेळके हे शासकीय नोकरीत असल्याने सर्व कुटुंब नागपूरला स्थायिक झालेले. पण त्यांची शेतीची आवड शांत बसू देत नव्हती. मारवाड्याकडे भावकीची गहान पडलेली २५ एकर पडिक, नापिक जमिन १९९६ मध्ये विकत घेतली. अगदी पावसाळ्यातही ती पिकत नव्हती. हिवाळ्यात कॅनालच्या पाण्याने पानथळ असल्याने पिकत नव्हती.

मनिष यांचे शिक्षण नागपूर व पुण्याला झाले. त्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर ते हॉटेल व्यवसायात उतरले. मेहकरमध्ये खानावळीचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर हॉटेल सुरु केले. या व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी त्यातील उत्पन्न शेतीच्या सुधारणेसाठी खर्ची घालण्यास सुरवात केली. ब्लास्टिंग करुन खडक फोडला व या दगडांचा वापर करुन बांधबंदिस्ती केली. धरणातील गाळ आणून सहा फुट खोलीपर्यत गाळ भरुन जमिनी तयार केल्या.

दरम्यान, त्यांनी मेहकर परिसरात पडीक जमिनीत गुंतवणूक करणे सुरु ठेवले होते. अवघ्या 30 हजार रुपये एकर दराने एकर दोन एकर कोरडवाहू जमीनी घेत गेलो. मध्यंतरी कुटुंबाने घेतलेल्या २६ एकर जमिनीतील कॅनालला तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीत पाणी आले नाही. पानथळ जागा कोरडी झाली. याचा फायदा घेवून त्यांनी ही जमिन उपजावू करण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी स्वतः गुंतवणूक केलेल्या जमिनींची विक्री केली. त्यातून मिळालेला सर्व परतावा हा त्यांनी कुटुंबाच्या जमिनीच्या विकसनासाठी खर्ची घातला.

यापैकी १६ एकर क्षेत्रात त्यांनी केळी लागवड केली असून या सर्व क्षेत्राला शेवरीचे कुंपन केले आहे. शेतातली ड्रेनेज सिस्टिम केली आहे. सर्व पाणी नदीच्या दिशेला वाहून जाते. निचरा सहज होतो. शेतातून गेलेल्या नाल्याला दोन्ही बाजूने दगडाचे पिचिंग केले आहे. शेतात 82 फुल खोल विहिर खोदलेली असून तिला 18 आडवे बोअर मारुन पाणी संकलित केले आहे. कर्ज काढून त्यांनी संपूर्ण शेतीचा स्वयंचलित सुक्ष्मसिंचन प्रकल्प उभारला आहे. पाण्याबरोबर खतेही या प्रकल्पातूनच दिली जातात. २७ महिन्यात केळीची तीन पिके घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्यावर कटाक्ष ठेवल्याने फक्त साडेसहा महिन्यातच त्यांच्या केळीला घड लगडले आहेत. विक्रीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. एप्रिलमध्ये १० एकरमध्ये १७ हजार रोपे, जुलै मध्ये तीन एकरमध्ये ४९०० रोपे तर सप्टेंबरमध्ये तीन एकर १५ गुंठ्यात ५५०० रोपे लावली आहेत. सर्व पिक जोमदार आलेले आहे. केळीशिवाय ते सहा एकर क्षेत्रावर हरभरा, सव्वा एकर गहू व अर्धा एकर कांदा बिजोत्पादन करत आहेत. केळी मध्ये आंतरपिक म्हणून त्यांनी लसून लावला आहे. यापुर्वी त्यांनी ११ एकरात घेतलेल्या सोयाबीनपासून फक्त 43 ते 48 हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. आता 16 एकर केळीतून सुमारे 48 लाख रुपये नफ्याचे त्यांचे गणित आहे.

मनिष यांनी वडिलांची आदर्श शेतीची इच्छा पूर्ण केली आहे. वडील मुख्य अभियंता म्हणून शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून शेतीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी मदत करत आहेत. आई व पत्नीचीही त्यांना मोठी साथ आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेळके यांनी विविध व्यवसायांचा अवलंब करुन पाहिला. स्वयंपाकाची आवड असल्याने त्यातल्या त्यात हॉटेल व्यवसायाने त्यांना खुप चांगली साथ दिली. खानावळ चालवली. आता शेताजवळच नवीन हॉटेल सुरु करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मध्यंतरी त्यांनी मित्रांच्या आग्रहास्तव राजकारणाचीही चव चाखली. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय काम केले. मात्र त्यांचा
शेतीतला रस पाहून खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांना राजकीय जबाबदारीतून मोकळे करुन शेतीकडे
लक्ष द्यायला सांगितले आणि तो निर्णय योग्य ठरला. 

शेतकरी रियाज कन्नोजे - भिवापूर

नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर हे तालुके दगडी कोळश्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूरहून गडचिरोलिला जाताना दगडी कोळसा वाहणारे ट्रक, टंपरच्या उगराटातून गाडी चालवणं म्हणजे कसरत असते. मुळात रस्ता बारिक आणि त्यात हे लोकं प्रचंड रॅश गाड्या चालवतात. हे कमी म्हणून 99 टक्के वेळा कोळसा झाकलेला नसतो, त्याला जोड रस्त्यावरच्या फुपाट्याची असते. या सर्वांचा कळस उमरेडमध्ये होतो. नको नको होतं उमरेड भिवापूरच्या या पट्ट्यात. तिथं मला हा गडी भेटला. तशी भेट नागपूरच्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनात झाली. पण फोनवर बोलणं सरु होतं. कोळश्याचा खाणीचा संदर्भ सुरवातीला यासाठी दिलाय की कन्नोजे हे खाणीत काम करुन शेती करणारे कृषी पदविकाधारक शेतकरी आहेत.

काही लोकं प्रचंड धोरणिक असतात. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक वगैरे प्रकारचं वारं कधी कुठल्या दिशेला फोफावेल आणि त्यानुसार कशाचं मार्केट व संंबंधित लिंकेज कसे हालतील याचा अंदाज त्यांना बरोबर येतो. रियाजरावांचे वडील हे त्यापैकीच एक वल्ली. भविष्यात कोळशाच्या खाणीचा विस्तार होईल, त्यावेळी आसपासची जमिन अधिग्रहीत होईल, ती अधिग्रहीत झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना खाणधारक कंपनीच्या सेवेत समावून घेतले जाईल याचा अंदाज त्यांना कित्येक वर्षे आधीच आला. आणि त्यानुसार त्यांनी भिवापूर जवळील बेसूर गावी आठ एकर शेतजमिन घेतली आणि ठेक्याने म्हणजेच खंडाने किंवा भाड्याने दिली.

बेसर हे रियाज यांच्या मामाचं गाव. बारावी झाल्यानंतर रियाज शिवशंकर कृषी विद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी बेसूला आले आणि कृषी शिक्षण घेता घेता त्यांची शेतीची आवड वाढत गेली. मग ठेक्याने दिलेल्या जमिनीपैकी दोन एकर आपल्या हाती घेवून त्यांनी शेतीचा श्रीगणेशा केला. पहिल्या खरीपात 2 एकरात फक्त 3 पोती सोयाबीन झाले. इतर लोकांची त्यावेळी एकरात 10 पोती झालेली. 

त्यानंतर कालव्याच्या पाण्याच्या आसऱ्यावर त्यांनी रब्बीत गहू व हरभऱ्याचे (चना) उत्पादन घेतले. त्यात 13 पोती गहू आणि तीन पोती चना झाला. या यशाने त्यांची शेतीची आवड आणखी वाढली आणि मग पुढच्या वर्षी त्यांनी शेती ठेक्याने द्यायचे बंद करुन सर्व स्वतःकडे घेतली. आयडीबीआय बॅकेकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेवून त्यांनी बोअरवेल घेतला आणि पाण्याची सोय करुन भाजीपाला उत्पादनाकडे वळले. संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणली. मग हळहळू मेथी, वांगी, टोमॅटो, कारले, मिरची, चवळी, फुलकोबी आदी भाजीपाला उत्पादन सुरु केले. शेतीची शैक्षणिक पार्श्वभूमी, शेतातील काटेकोर कामाचा अनुभव आणि जोडीला स्थानिक शेतकरी गटातील तरुण मित्रमंडळीची साथ या जोरावर उत्पादन वाढू लागले. यश मिळू लागले.

कापसाची लागवड त्यांनी 2012 पासून सुरु केली. सहा एकरात एकरी 26 क्विंटल सरासरी उत्पादन मिळवले. सध्या पाच एकर कपाशी, चार एकर चना आणि दोन एकरवर त्यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे.

गेल्या वर्षी कन्नोजे यांची 10 जमीन वेस्टर्न कोल्डफिल्ड या कोळशाच्या खाणीसाठी गेली. जमीनीच्या परताव्यासोबतच त्यांनाही  कंपनीत नोकरी लागली. सध्या ते गावातच नोकरी करता करता शेतीतही काटेकोरपणे प्रगती करत आहेत. एक पूर्णवेळ माणूस शेतीकामासाठी ठेवला असून आवश्यकतेनुसार मजूरांकडून कामे करुन घेतात. कापूस आणि भाजीपाला उत्पादनात त्यांचा चांगला जम बसला आहे.

कापूस उशीराच्या पावसात सापडू नये म्हणून ते मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वीच ठिबकवर 7 जूनपर्यंत लागवड करतात. पुर्वी 25 मे ला रोवणी करायचे. हा बदल केल्याने कपाशीचे नुकसान होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. अशा पद्धतीने स्थानिक परिस्थितीनुसार बदल करत त्यांनी उत्पादनात सातत्य राखण्याची हातोटी मिळवली आहे.

शेतकरी गट व मित्रमंडळीमार्फत त्यांचे गावात, शेतात पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नाले, बंधारे, जलयुक्त शिवाराची कामे सुरु आहे. कित्येक वर्षे कोरडवाहू शेती केल्यानंतर ओलिताच्या शेतीने प्रचंड फरक पडतोय, हे लक्षात आल्यानंतर आता पाणी संचय व त्यातून ओलीताची शेती समृद्ध करण्याकडे येथील तरुणांचा कल आहे. रियाज कन्नोजे यांना भाजीपाला व कपाशी उत्पादनातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्य शासनामार्फत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे.


शेतकरी सचिन सारडा - वाशिम

विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचे, आचार आणि विचाराचेही अनेक पदर आहेत. हळूहळू एकेक उलगडतोय. महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागातील शेतकरी आणि विदर्भातील शेतकरी यांची तुलनाच होवू शकत नाही. जे भेटतं ते वेगळंच आणि कमालीचं रंजक असतं. 2014 सालच्या कृषी पुरस्कारांची घोषणा कृषी विभागाने 2018 साली केली त्यात हे नाव आलं... सचिन सारडा, मु.पो. शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशिम.

सचिन सारडांनी कुटुंबाच्या पारंपरिक शेतीचा चेहरामोहरा हळद व केळी उत्पादनातून बदलून टाकला आहे. शेती खरंच चांगली आहे मी बरिच माहीती घेतली, क्रॉस व्हेरिफिकेशनही केलं. क्रॉस व्हेरिफिकेशनची गरज अशी वाटली की हा माणूस एकेका शब्दाचा हिशेब ठेवतो आणि त्या शब्दाचा फॉलोअपही प्रचंड घेतो. मला तर वैतागून टाकलं साहेबांनी. बरं काम चांगलं आहे आणि जोडीला प्रसिद्धीची आवडही आहे, त्यातून स्थानिक पत्रकारांशी मैत्री आहे त्यामुळे त्यांच्या वावरातलं पान हललं तरी बातमी येते हे त्यांचे वॉट्सअप स्टेटस पाहून पटतं. 

त्यांचे कौशल्य असे की कुठकुठपर्यंत ते पोचतात, फॉलोअप असतात. सरासरी दर महिन्याला किमान दोन तरी पुरस्कार त्यांना मिळत असावेत असं माझं गेल्या सहा महिन्याचं निरिक्षण आहे. जे काही आहे ते खासीयत आहे या मानसाची. वेगळंच रसायन आहे. प्रसिद्धीतला फोलपणा कोळून पिलेल्या माणूस जेव्हा हे असं रसायन पाहतो तेव्हा अनेक गोष्टी खटकतात. पण त्यांची ही धडपड पोकळ नाही हे त्यांच्या शेतीतले अपडेट पाहील्यावर कळतं आणि मग प्रसिद्धीचा सोस दुर्लक्षित करुन त्यांच्यातल्या शेतकऱ्याचं मला खरंच कौतुक वाटतं...


सारडा कुटुंबाची दहा एकर बागायती शेती आहे. त्यांचे बीकॉम शिक्षण झाले आहे. दोघा भावांपैकी सतीश हा भेटवस्तूंच्या विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सांभाळतो. शेतीची संपूर्ण जबाबदारी सचिन पाहतात.
नोकरीच्या मागे न लागता वडिलांनंतर सचिनने शेतीलाच सर्वस्व मानले आहे. कृषी विभाग आणि करडा कृषी विज्ञान केंद्राच्या ते सातत्याने संपर्कात असतात. वाशिम जिल्ह्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन शेतीत काय बदल करता येतीलयाच्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो. 

पूर्वी सारडा कुटुंबिय सोयाबीनहरभरा आणि तूर अशी पिके घेत होते. सचिनने या पिक पद्धतीत बदल केला. सोयाबीनमध्ये तुर आंतरपिक घेऊन दोन्ही पिकांचे चांगले उत्पन्न घेतले. त्यानंतर ते हळद पिकाकडे वळले. सरी वरंबा पद्धतीने २०१०-११ मध्ये दोन एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली. त्यातून त्यांना 40 क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन झाले. हिंगोली बाजारपेठेत त्यास आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानंतर तातत्याने ते हळदीचे यशस्वी उत्पादन घेत आहे. आता हळद हेच त्यांचे मुख्य पिक झाले आहे. एकरी 30 क्विंटल उत्पादनाचा उच्चांक त्यांनी शिरपूरमध्ये प्रस्थापित केला आहे.

हळदीला चांगला बाजारभाव मिळविण्यासाठी ते हिंगोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. हळदीच्या दराची माहिती घेतात आणि दर कमी असल्यास वाशीम येथील गोदामामध्ये हळद तारण ठेवून आवश्‍यक कर्ज रक्कम उचलतात.

केळी उत्पादनातही त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. झाडांची दीड एकरात 1700 संख्या, सात बाय सात फूट अंतरावर लागवड. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर, ठिबकच्या साहाय्याने दर महिन्याला शिफारसीत खतांची मात्रा ही त्यांच्या केळी उत्पादनाची वैशिष्ये आहेत. 2011-12 या वर्षात दीड एकरावर त्यांनी केळीची लागवड केली होती. काटेकोर पिक व्यवस्थापन करुन त्यांनी केळीचे दर्जेदार उत्पादन घेतले आणि दरही चांगला मिळवला. सरासरी दर वर्षी ते केळीपासून दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात.

सारडा यांची संपूर्ण शेती ठिबक व तुषार सिंचनाखाली आहे. शेतात गांडुळ खत उत्पादक प्रकल्प सुरु करुन करून त्यांनी सेंद्रिय शेतीचाही अवलंब केला आहे. गावातील शेतकरी गटातही ते सक्रीय आहेत. दुग्धव्यवसाय, शेडनेटमधील भाजीपाला उत्पादन आदी विषयांचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. सारडा यांना 2014 सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.








पोळा बाजार, गडचिरोली

आमच्या गडचिरोलीच्या पोळ्याला यायचं हं !
भात लागण उरकली. पाऊसपाणी चांगलाय. शिवाराला बरकतीची चाहूल लागलीये. धन्याच्या खुशीनं गेली चार महिनं ढोरासारखी राबलेली बैलं सुखावलीत. उद्या त्या सुखाचा सर्वोच्च सण. श्रावणी बैलपोळा.
इथं गडचिरोलीत गेली आठ दिवस छोट्या मोठ्या बाजारपेठा पोळ्यासाठी सजल्यात. गळपेंडी, बाशिंगं, झुली, बेगडं, घुंगरमाळा, दिष्टमनी, वशिंडाची बाशिंगं, तोडे... एक ना अनेक गोष्टी काय अन् किती म्हणून इचारू नका.
दर बारा कोसावर पोळ्याची स्टाईल बदलतीये. रंग बदलताहेत, साजरेकरणाचे ढंग बदलताहेत. माती कमी आणि लाकडं जास्त असलेल्या या भागात मातीच्या बैलांपेक्षा मदनावर ठेवून पुजण्यासाठी बाजारात लाकडाचीच बैलं जास्त.
बैलांना खाऊ घातला जाणारा नैवेद्यही अफलातून आहे. शेतकऱ्याच्या घरातलं सुखोत्सवाचं सर्वोच्च जेवण तुप लावलेली पुरणपोळी तर आहेच. पण जोडीला इथलं मुख्य पिक असलेला भात आणि शेतकरी वर्षभर ज्या ज्या भाज्या खातात त्या सर्वांची एकत्रित मिक्सव्हेज भाजी भात हे इथल्या नैवेद्याचे वैशिष्ट्य. आजच्या बाजारात हे नैवेद्यासाठीचं कडेबोळ विकत मिळत होतं गावोगाव, हे आणखी थोर.
टँक्टरनं चिखलात रोहकोळ घालण्याच्या जमान्यात इथं बैलांची संख्या तशी अजूनही लक्षणीय आहे. बैलांची संख्या जास्त असलेली गावं बैलपोळा, जत्रा, यात्रा, शंकरपट आणि झाडीपट्टीच्या नाटकांसाठीही केंद्र आहेत. आणि दर्दी लोकांच्या रसिक जगण्याची ही. भात कापणीला सुरवात होईल तेव्हा ही रसिकता शिगेला पोचेल आणि मग मोकळ्या होत जाणाऱ्या खाचरांमध्ये शंकरपटाचे अन् झाडीपट्चीचे खेळ रंगतील.
नव्या पै पाहूण्यांच खास आमंत्रण आहे...
आमच्या गडचिरोलीच्या पोळ्याला यायचं हं !









बैल पोळा, गडचिरोली

चार वाजता त्या जंगलातल्या गावात गावातल्या झाडून सगळ्या बैलजोड्या जमा झाल्या. सर्व बैल सजवलेले, झुली, बेगडं, बाशिंगं, तोढे वगैरे वगैरे वगैरे
अर्धा तास ताफा चालला. पाचसात गाणी चांगली वाजली ढुमक्यावर, मग पोळा फुटला आणि बैल जोड्या गावभर पांगल्या.
प्रत्येक गल्लीत आपापल्या दरीदारी सुवासिनी बैलांना ओवाळायला ताट घेवून आणि खावू घालायला कालपासून खपून तयार केलेली मिक्सव्हेज भाजी भात, पुरणपोळी सुपात घेवून सज्ज होती.
बैलजोड्या एकामागून एक दारोदार दर्शन देत होत्या. घरातील तान्ह्या पोरापासून खुरटलेल्या म्हताऱ्यापर्यंत सगळे बैलांची पुजा करून पाया पडत होते. सरतेशेवटी ज्यांच्या मेहनतीच्या बळावर पसापसा करून भरल्या सुपानं वारंत उफनत धान्याच्या राशी घरात येतात, त्याच सुपात बैलांसाठी केलेलं पुरणपोळीचं जेवण त्यांना वाढलं गेलं. कण न् कण बैलांनी चाटून पुसून खाल्लं की घरधनी धनिन समाधानी नजरेनं भरून पावायचे...
Point to be noted... एका घरात अनेक बैलजोड्यांची पुजा होते. ज्यांचा व शेतीचा संबंध नाही अशा बारा व्यवसायिकांपासून ते नव्या समाजरचनेची मास्तरकी बँकवाले यासारख्या नव्या गावकामगारांपर्यंत सगळ्यांच्या घरी तोच पाहूनचार, स्वागत, दर्शन, कृतज्ञता...
बैलं जेवेपर्यंत घरातलं लहान पोरगं ही भजी किंवा डाळवड्यालाही तोंड लावत नाही. बैलपुजा झाली आणि जेवणावळी बसल्या.
दिल्लीच्या परोठ्याच्या आकाराच्या दुधाळ आणि मधाळ पोळ्या. गुळवणी हा प्रकार नाही. बैलांसाठी खास बनवलेला मिक्सव्हेज, सोबत आणखी एखादी भाजी, एखादा गोड पदार्थ, इथले प्रसिद्ध चपटे पापडाएवढे गोल आणि पाच रुपयांच्या दोन डॉलरएवढे जाड डाळवडे... हान मर्दा...
मग पान सुपारी. तेवढं करून झालं की गडी मानसांना पत्त्याच्या डावाचे वेध लागतात. मास्तर लोक, डॉक्टरलोकांपासून हातावर पोट असलेल्या मजूरापर्यंत सगळे गुण्या गोविंदाने आपापली भट्टी जमवून पत्ते खेळत बसत्यात, दोन दिवस पत्त्यांचे...
आणि हो आज संध्याकाळी घराघरात मदनावर लहान पोरांच्या हस्ते छोटाले लाकडाचे बैल पुजले गेले. अगदी आरत्या म्हणू म्हणू. आज मोठा पोळा झाला... उद्या लहान पोरांचा आणि त्यांच्या लाकडांच्या बैलांचा तान्हापोळा होणार.
आज गोडाचा पोळा, श्रावण संपला. उद्या तिखटाचा पोळा, बोकड, कोंबड्यांची तजविज रेडी आहे.
लहान मुलांच्या लाकडाच्या बैलांची मिरवणूक निघणार, मग समारोपाला मुलांना वह्या, पेन, खाऊ वाटप होणार. काल गोडधोड खाल्लेल्या पाहूणे यांनी उद्या गावोगाव मांसाहारी जेवण खाऊ खालण्यात येणार. तान्हापोळा मोठ्या जल्लोशात संपन्न होणार.
(दारूचा वास सहन होत नाही त्यांनी नाकात व कानात कापूस कोंबण्याची तयारी ठेवावी, बाकी ऑल इज वेल....गडचिरोलीत कुठेतरी)
- - - - -
२५ वर्षापूर्वी जुन्नरला निमगिरीच्या पुढचा केशव दुंदा मुकणे आमच्याकडं कामाला होता. घरच्यासारखं सगळं. मी शाळकरी होतो.
मुख्य पोळा झाला. पुरण पोळी सारभात. मावळी पोळ्या. प्रचंड आग्रह. पाव्हणा कुणाच्या घरी जेवणार यावरून भांडणाची वेळ.
केशवच्याच घरी दोन पोळ्यात टम्म फुगलो. जेवण करून खडकावं बसलो तर मंडळी तंबाखू खायला लागली.
मी शाजूक प्रश्नकरी, काय व्हतंय, कसं व्हतंय
ते म्हणे पचाया चांगली असती. आमच्याकं बारकी पोरं बी खात्यात.
वाघाला चँलेंज ? बनवा इडा...
ठेवली तोंडात... आगागागा... असली गुचकी लागली पुढचे ४ तास प्रचंड हैराण...
आज नवा शेतकरी सोयरा पानाचा आग्रह करायला लागला जेवण झाल्यावर. पान खाल्यावर पानउतारा व्हतो त्यामुळं वर्षा दोन वर्षातून एखाद्यापलिकडं मजल नसती.
इथलं मसाला पान म्हणजे मसाला तोंडी लावण्यापुरता, पानंच तेज, टपरीवालं म्हणलं सुपारी ? टाक !
आता आपल्याला काय माहित कच्ची पक्की. चार तास झाले, डोकं जाम झालंय. बेक्कार नाद बॉ...




तान्हा पोळा, विसोरा, गडचिरोली

सण साजरे करावेत तर कोरडवाहू किंवा हंगामी बागायती शेतकऱ्यांनीच. दावण असलेल्या बारमाही बागायतीवाल्यांच ते काम नाही. ते सदा कामावर पासले पडलेले. पाव्हणं आलं तरी त्यांच्याशी बोलायला टाईम नसतो.
मुळात पाव्हणं (घरचं काम चुकवून) पाव्हण्यांकडं येत्यात सणाची मजा लुटायला तर घास, मका कापण्यापासूनची कामं करावी लागत्यात. यामुळं बरेच पाव्हणे यायचे बंद झाले आमच्याकडं 
त्यामुळं मुलगी द्यायची तर पठारावर, कोरडवाहू भागात आणि सुन करायची तर बागायतातली असा रिवाज होता कैक पिढ्यांचा. आमच्या गावातल्या मुली प्रचंड कामदार, मान वर काढायला जागा नसती. असलच कशी...
सकाळी उठल्यापासून घरची कामं करायची, आई बापाला शेतात कामाला मदत करायची, जनावरांच्या खान्यापिण्याची कामं तर पोरापोरींच्याच जिवावर, संध्याकाळचा स्वयंपाकही, उरलेल्या वेळात शाळा आणि अभ्यास, जडीपाच्या कामाची सवय. यामुळं मुली शेती व घरसंसाराच्या सर्व बाबीत तरबेज. त्यामुळं सोयरेधायरे एकदम उडीवर. सुन करायची तर पारगावची करा.
पण लेक द्यायची तर... उलटं. दिली तर तिचं काय खरं नाय, पाठ टेकवायला टाईम भेटणार नाही, काम करू करू भुसकाट पडणार. त्यापेक्षा दुसरीकडं बघा. कृषी संस्कृतीतील या अशा अनेक भन्नाट गमती जमती आहेत. अनेक प्रथा परंपरा सहज जन्मतात रुढ होतात, जगणं सुसह्य करत जातात.
आता इथं विदर्भातली ही तान्ह्या पोळ्याची प्रथा, नागपूरकर भोसल्यांच्या काळात सुरू झाली, अतिशय संपन्नतेने मुलांमध्ये संस्काराची सुबोध पेरणी करत मस्त पैकी सुरू आहे. आज अनुभवली, फार फार संपन्न वाटलं. Thanks to Visora & Visorakar farmers.

महिला जिवनाची वेगळी बाजू - गडचिरोली

गडचिरोलीत एक गोष्ट पावलोपावली खुप प्रकर्षाने जाणवतेय, इथलं स्रीजिवन बंधमुक्त, जोखडमुक्त नितळ आहे. मुलींचा, महिलांचा एवढा सहज संचार, मुक्त फ्रँकनेस वावरणं मी आख्या भारतात (इशान्य सोडून) कुठं पाहिलेलं नाही.
परवा पोळ्याला इथल्या शेतकरी मित्रमंडळींच्या घरी होतो. आपल्याकडं संक्रातीला जसं तिळगुळ देवून पाया पडतात तसंच इथं पोळ्याला एकमेकाच्या कपाळी अक्षता लावतात व पाया पडून एकमेकांचे आशिर्वाद घेतात. त्यात भेद नाही. म्हणजे एकतर्फी कोणतीच बाब नाही. स्री ने पुरूषाच्या कपाळी अक्षता लावल्यानंतर पुरुष मग तो कुणीही असो, तो पण समोरच्या स्री च्या कपाळी अक्षता लावतो. अतिशय नितळ व सहजभाव आचरण.
लग्नात बायकोच्या कपाळी कुंकू लावण्याचा प्रसंग सोडला तर मी आयुष्यात कधी कोणत्याही स्रीच्या कपाळी स्पर्ष / औक्षण वगैरे केलेलं नाही. अगदी बहिणींनी राखी पौर्णिमा किंवा भाऊबिजेला ओवाळलं, डोई अक्षता टाकल्या तरी आपण बहिनींना औक्षण करत नाही किंवा अक्षता लावत नाही. बाकी कोणत्याही स्रीची अगदी औक्षणाचीही कल्पनाही करणे दूर. त्यामुळं इथं मी पार गोंधळून गेलो.
पहिल्या जेष्ठ वहिनी आल्या, माझ्या कपाळी अक्षता लावल्या क्षणभर त्यांनी मी अक्षता लावायची वाट पाहिली आणि माझा ढिम्मपणा पाहून थोड्या खजिल चेहऱ्यानं पाया पडायला वाकल्या. त्या माझ्याहून मोठ्या, मी मागे सरकलो आणि त्यांच्या पाया पडलो, लांबून दोघांचंही एकमेकाच्या पाया पडलं गेलं.
झालं दुसऱ्या वहिनी आल्या. आता मी बाकी मित्रमंडळींकडं बारकाईनं पाहू लागलो. ते सर्वच एकमेकांना औक्षण करत होते, कपाळी अक्षता लावत होते. आता मला माझी चुक कळली. मी काही एलियन नाही राव, तसं वागून कसं चालेल. मग मी ही त्यांना औक्षण केलं. नँचरली तराजूची दोन्ही परड्या टांगलेली आडवी पट्टी (काहीतरी शब्द आहे तिला, आत्ता विसरलो) क्षितिजसमांतर व्हावी तसं वाटलं.
सहा वर्षांच्या आतील दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या (बाल बालिका लिंग गुणोत्तर) गडचिरोलीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. (रत्नागिरीत स्री पुरुष गुणोत्तर सर्वाधिक दिसत असले तरी त्याचे कारण पुरुषी मंडळी बायकांना घरी ठेवून मुंबईत कामधामाला जाण्यात आहे, स्रीजन्मात नाही.) सो कॉल्ड पुढारलेल्या, पुरोगामी व सुधारणावादी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांपेक्षा १०० हून अधिक आहे. स्रीला माणूस म्हणून समानतेचा दर्जा असल्याशिवाय हे होऊ शकतं का ?
एक महत्वाची गोष्ट अशी की हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. असे लोक की जे जाती धर्माच्या बेगडी चौकटीबाहेर राहीले, अनेकांनी त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलाही पण त्यांनी आपले सत्व व नैसर्गिक सात्विक परंपरा कायम राखली. या परंपरेत स्री स्थान मानाचं आहे. हिंदू, मुस्लिम किंवा तत्सम धर्म व त्याअंतर्गत जातीपातींसारखं तिला वेगवेगळ्या गोष्टींत बांधून दडपून ठेवणारं नाही. आणि स्री मुक्त असूनही स्वैराचार नाही, हे सर्व सनातनी धर्ममार्तंडांच्या डोळ्यात झणझणित अंजन घालणारं सत्य. 
वरचा मुद्दा सेम टू सेम लागू पडतो महाराष्ट्रातील सर्वच आदिवासीबहुल भागाला. मग तो नंदुरबार असो किंवा आमचा जुन्नर-आंबेगाव-खेड चा पश्चिम पट्टा. स्रियांच कौटुंबिक स्थान डावं उजवं असलं, मानसातल्या श्वापदांची ती अनेकदा शिकार होत असली तरी तिचं स्थान मानाचं आहे. समानतेचं, सहजतेचं, मोकळीकतेचं आहे. डुज अँन्ड डोन्ट्स च्या पलिकडचं आहे, हे विशेष.

रामटेक, नागपूर

ज्ञानतपस्वी अगस्तीजी इथं राजकन्येशी लग्न करून आश्रमात तपश्चर्या करत होते.
प्रभू रामचंद्र वनवासात त्यांची भेट घ्यायला इथं आले. सहकुटुंब बरेच दिवस राहीले. रावणजींचा वध करायची प्रतिज्ञा त्यांनी इथेच केली, आणि इथून पुढे नाशिकला गेले.
बौद्ध धर्मीय ज्ञानतपस्वी नागार्जून स्वामी यांनी इथं कित्येक वर्षे तपश्चर्या केली.
महानुभव पंथाचे आद्यआचार्य चक्रधर स्वामी यांनीही पंथोपदेश करण्यासाठी काही काळ (१० महिने) इथं वास्तव्य केले.
कालिदास गावाच्या एका अनाडी मानसानं श्रीराम प्रभूंच्या कृपेेने इथेच मेघदूत नावाचे विश्वप्रसिद्ध, जगद्मान्य संस्कृत महाकाव्य लिहीले.
नागपूरकर भोसले महाराजांनी इथल्याच अंबाला तलावात आंघोळ करून केलेल्या प्रतिज्ञेनुसार मंदिरांच्या संरक्षणार्थ इथं किल्ला उभारला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इथं १२ वर्षे तपश्चर्या केली.
विष्णूजींनी इथेच नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूजींचा टेटवा फाडून डेंडाळा बाहेर काढला, वध केला.
वाकाटक साम्राज्य इथूनच चारिदिशा वाढलं फोफावलं...
बाकी सटर फटर तं न बोललेलंच बरं ना भाऊ... इथं सगळं थोर आहे !







नगरधन किल्ला

नगरधन. वाकाटक साम्राज्याची राजधानी. एक असं साम्राज्य की जे अरबी समुद्रापासून सातपुड्यापर्यंत आणि नर्मदेपासून भिमा खोऱ्यापर्यंत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशात पसरले होते. एक असं साम्राज्य ज्यांने सलग २५० वर्षे या सर्व भागाच्या सर्वांगिन प्रगतिची बिजं रोवली व यशस्वीपणे फोपावलीही. एक असं साम्राज्य की ज्याच्या सोयरीकी थेट चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत होत्या आणि जिथं एका महिलेने सलग २० वर्षे यशस्वी राज्यकारभार केला, तिच्या लोपमुद्रा आजही सापडतात इथल्या उत्खननात.
गुगल सर्च ला भरपूर काही सापडतं वाकाटकांविषयी. पुरातत्व विभागानं इथं खोदकाम केलंय. त्यातही सापडलंय भरपूर काही... प्राचिन संस्कृती, तत्कालिन माणसांच जगणं स्पष्ट करणारं, इतिहासाची हरवलेली पानं सापडताहेत, जे सापडतंय त्यातून अनेक गोष्टी जुन्या समजांना, आत्तापर्यंतच्या गृहीतकांना फाट्यावर मारून नवीनच काही गोष्टी सांगू पाहताहेत...असंही बरच काही आहे.
पुराणातील वांगी पुराणात ठेवून तत्कालिन शेती व शेतकऱ्यांची अवस्था काय होती, हे समजू पाहतो तेव्हा इथं माझ्या हाती धतूरा येतो. कुणाच्या हाती काही असेल तर कळवावं.
या किल्ल्यात व भोवती बरंच उत्खनन झालंय, सुरू असतं त्या त्या वेळी बरच काही. भातखाचरं, तुर आन् पडकाच्या रानात सापडलंयही बरंच काही. उत्खननाच्या खड्ड्यात लागलेलं पाणी पाहून रानमालक शंकररावांना थोडी उभारी आलीय, पावसानं भात घालवलाय त्यांचा आणि उत्खननाच्या खड्ड्याची विहिर करून पाणी उपसायची सोय कशी करायची या इचारानं त्यांच्या डोक्याचा गोयंदा झालाय.
सध्या वाकाटकांच्या या राजधानीत शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही, कालिदासाच्या यक्षाला खुणावणारे मेघ शेतकऱ्यांना मात्र वाकुल्या दाखवताहेत, अपुऱ्या पावसामुळं काही रानं पडीक पडलीत, भात खुरटल्यासारखा आहे, तूर नाही पेक्षा ठिक आहे. नापेर क्षेत्रात चना बुना करायच्या इचारात बांधाची गवत कापताहेत मंडळी, त्याला मात्र मरान नाही आणि ब्रोकर मंडळी घिरट्या हालताहेत डांबरी डांबरीनं.
रामटेकवरील लिखान खरं मानलं... खरं मानलं की बळीवंशातील हिरण्यकश्यपूचा वध इथं झाला, म्हणजे वाकाटक वगैरेंच्या आधी कधी तरी इथं बळीराजाच्या राज्याचाही केंद्रबिंदु असावा. असं असेल तर... आणि बळीनंतर वाकाटकांनी राज्य केलं असेल आणि त्यामुळे भरभराटही झाली असेल अगदी अजंठा वेरुळचीही... तरी मग इथले शेतकरी इडा पिडा टळो, वाकाटकांचे राज्य येवो असं का म्हणत नाहीत कोण जाणे.







झिरो माईलस्टोन - नागपूर

नागपूरचं अनन्यसाधारण भौगोलिक महत्व स्पष्ट करणारा हा झिरो माईलस्टोन. अर्थात भारताचा शुन्य मैलाचा दगड. आज पाहिला. पण मनात अनेक प्रश्न उभे राहीले. नेटवर शोधलं. अभ्यासूंना विचारलं. पण अजून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाही. कृपया, आपल्या कुणाला काही माहित असेल तर मार्गदर्शन करावे ही आग्रहाची विनंती....
१) हा भारताचा शुन्य मैलाचा दगड समजला जातो. म्हणजे भारत 0 km. हा भारताचा मध्यबिंदू आहे म्हणतात.
- हा भारताचा मध्यबिंदू इंग्रजांनी स्वातंत्र्य पूर्व काळात ठरवला व त्या अनुषंगाने अंतरंमोजली. तेव्हाची भारतीय भुप्रदेश व आत्ताचा भारतीय भुप्रदेश वेगळा आहे. त्यानंतर पाक, बांग्ला, भुतान, नेपाळ वगैरे भारतापासून वेगळे झालेत.
Q - हे सर्व बदल झाल्यानंतरही त्यापुर्वीचा भारताचा मध्यबिंदू आजही कायम आहे का ?
Q - पाक, बांग्ला, भुतान, नेपाळ यांचेही त्यांच्या त्यांच्या देशाचे झिरो माईलस्टोन आहेत का ?
2) अमेरिकेचा झिरो माईलस्टोन वॉशिंग्टन डीसी मध्ये आहे. तत्पुर्वी रोम मध्ये कधीतरी दोन शहरांतील अंतर मोजायचा प्रयत्न झाला होता म्हणतात पण तो फसला वगैरे काहीतरी आख्यायिका आहेत.
- झिरो माईलस्टोन ची कन्सेप्ट इंग्रजांनी भारत व अमेरिका या त्यांच्या वसाहती असलेल्या भागात वापरली. मग...
Q - जसा राष्ट्रीय पातळीवर राष्ट्राचा, तसा जागतिक / पृथ्वी पातळीवर जगाचा किंवा पृथ्वीचा झिरो माईलस्टोन आहे का ?
Q - असल्यास कुठे आहे, कधीपासून सुरू झाला हा उद्योग ?
३) एकूणच या उद्योगात इंग्रज तरबेज दिसतात. त्याचवेळी पृथ्वी कुठूनही कुठलाही पॉईंट झिरो माईलस्टोन गृहीत धरून कोणत्याही दिशेला मोजली तर गणित चुकणार थोडच आहे. मग...
Q - इंग्लंडचाही त्यांचा स्वतःचा झिरो माईलस्टोन आहे का ?
Q - पृथ्वीचा किंवा जगाचा झिरो माईलस्टोन कुठे आहे ?
Q - की हा उद्योग इंग्लंडपासून सुरू झाला म्हणून इंग्लंडचाच झिरो माईलस्टोन हा जगाचा झिरो माईलस्टोन समजला जातो ?
४) हे सगळं प्रकरण झिरो भोवती फिरतंय... तर मग...
Q - जगात शुन्याचा वापर सर्वप्रथम कशासाठी केला गेला ? कुठे ?
Q - अंतरं मोजण्यासाठी सर्वप्रथम शुन्याचा वापर कुणी कधी कुठे केला. आणि नागपूर सारखं त्या ठिकाणीही कुठं असं शुन्याचं स्मारक आहे का ?
५) प्रत्येक गाव, शहर यातील अंतर पोस्ट ऑफिस ते पोस्ट ऑफिस मोजले जाते. पुणे ७१२ किलोमिटर असा बोर्ड हे शिवाजीनगर किंवा कोथरूड नाही तर पुणे सीटी पोस्ट ऑफिस किती अंतरावर आहे ते दर्शवित असतो. म्हणजेच प्रत्येक गावाचा, शहराचा स्वतःचा असा स्वतंत्र झिरो माईलस्टोन असतो. मग...
Q - देशात फक्त नागपूर येथिलच झिरो माईलस्टोन पोस्ट ऑफिस हे ३६५ दिवस २४ तास सुरू असतं असं म्हणतात. असं का ?
Q - देशात / जगात अजून कुठं असं ३६५ दिवस २४ तास चालू राहणारं पोस्ट ऑफिस आहे का...

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...