
काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गाडीच्या पुढच्या बाजूला स्कुटीवर दोन मुली थांबलेल्या. त्यांच्या पाठीमागे अजून दोन स्कुटी व त्यावरही मुली डबलसीट. माझ्या उजव्या बाजूला दुभाजकावर दोन मुलं हातात फुगे घेवून उभी होती विकायला.
या दोन पोरांतलं मोठं पोरगं आठवी नववीच्या वयाचं असेल... एक दर्द भरं गाणं म्हणत होतं दुसऱ्याला खिजवत खिजवत. दर्द से अपना रिश्ता तो पुराना है... त्यामुळे गाणं ओळखीच नसलं तरी आवाजातली कशीश भारी वाटत होती. एमपी युपी स्टाईलनं त्याचं आपलं चाललं होतं. तेवढ्यात मोठ्या पोऱ्याच्या लक्षात आलं सिग्नल लागलेला आणि त्यानं आपला मोर्चा थांबलेल्या लोकांकडे वळवला आणि माझ्या कारच्या पुढून मुलींकडे गेला.
चौकातलं मार्केटिंग हा सर्वच मेट्रो शहरांतला मोठा विषय. चौकाचौकात काही ना काही वस्तु विकल्या जातात सिग्नल लागल्यावर. कधी दयेनं, कधी कौतुकानं, कधी भिक मागण्यापेक्षा ही लोकं काहीतरी काम करताहेत या समाधानानं, कधी कनवेनं, कधी आवड तर कधी गरज म्हणून या वस्तू विकत घेतल्या जातात मोठ्या प्रमाणात. यातून सिग्नल मार्केटिंगचं मोठं विश्व उभं राहीलंय, जगात कुठंच मिळणार नाहीत अशा अनेक वस्तू सिग्नलला विकत मिळतात म्हणून माझं अनेकदा हे ह्युमन बिहेविअर स्टडीचं ठिकाण चालू चालूतलं. त्यामुळं माझं या दोन्ही पोरांवर बारिक लक्ष होतं.
मॅडम लो ना... लोना म्हणत ते पोरगं फुग्याची दोरी बांधलेली स्ट्रॉ पेक्षा मोठी प्लॅस्टिकची नळी सरळ त्या स्कुटी चालवणाऱ्या मुलीच्या छातीला टोचत होतं. आत्तापर्यंत त्या पोरांकडं सहानभुतीनं, त्याच्या आवाजातल्या दर्दी कशिशीनं मुलांविषयी मनावर साय जमा झाली होती. माझीच नजर तर दुषित नाही ना असंही वाटलं क्षणभर... पण तेवढ्यात त्या मुलीनं त्या पोऱ्याकडे अतिशय रागाने पाहत ती फुग्याची नळी हातानं झिरकाडली तसा माझ्या तळपायाची आग मस्तकात पोचली. साला ये तो साप निकला... सिग्नल सुटण्याच्या बेतात होता आणि माझ्या विरुद्ध बाजूला हे सुरु होतं. त्या मुलीने झिरकडल्यावर हा त्या पाठीमागच्या मुलींकडे गेला.
या वेळी त्याचा तो स्ट्रॉ जरा बाजूला होता हवेत. तशाही अवस्थेत पहिल्या मुलीला चुकून लागला असेल तो स्ट्रॉ... आपलाच गैरसमज झाला असेल असा विचार मनाला चाटत होता... तोच तो पोरगा पुन्हा आपल्या औकादीवर आलाच. त्यानं अतिशय झटकन तो स्ट्रॉ त्या मुलीच्या हॅडल धरलेल्या हाताच्या घालच्या बाजूने सरकवून पुन्हा तिच्या छातीला टोचायला सुरवात केली... मॅडम लो ना... लो ना... आता मात्र टाळकं सटकायची वेळ आलेली.. तिनंही झरकाडलं आणि तेवढ्यात सिग्नल सुटला... हा गडी पुन्हा मागं फिरला... या वेळी त्याच्या बत्तीशीत छद्मी हास्य होतं. क्षणभर वाटलं गाडी अशीच बाजूला घ्यावी आणि त्याच्या श्रीमुखात चार भडकावून द्याव्यात खणाखन... पण वेळ कुणाला होता. ना त्या मुलींना.. ना मला...
काही क्षणांचा प्रसंग, कोणी झिरकाडून निघून जातं, कुणी माझ्यासारखं पाहून हात चोळीत धुमसत निघून जातं. आपल्या लेखी वेळ टळलेली असते. पण तुमच्या आमच्या या वागण्यातून नकळत अशा वखवखलेल्या गिधाडांना पुढचं सावज शोधण्याचं आणि नवा खेळ खेळण्याचं बळ मिळत राहतं. मग ठिकाण नागपूरचा हा सेंट्रल चौक असेल मुंबईतलं एखाद्या वर्तमानपत्राचं ऑफिस असेल किंवा दिल्लीतला एखादा अंधारा कोपरा. आता सहन करणं खरंच बास झालं राव. जिथल्या तिथे हिशेब चुकता करायलाच हवा. विषवृक्ष पोसण्याआधीच त्याच्या मुळ्या छाटलेल्या बऱ्या...



No comments:
Post a Comment