नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर हे तालुके दगडी कोळश्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूरहून गडचिरोलिला जाताना दगडी कोळसा वाहणारे ट्रक, टंपरच्या उगराटातून गाडी चालवणं म्हणजे कसरत असते. मुळात रस्ता बारिक आणि त्यात हे लोकं प्रचंड रॅश गाड्या चालवतात. हे कमी म्हणून 99 टक्के वेळा कोळसा झाकलेला नसतो, त्याला जोड रस्त्यावरच्या फुपाट्याची असते. या सर्वांचा कळस उमरेडमध्ये होतो. नको नको होतं उमरेड भिवापूरच्या या पट्ट्यात. तिथं मला हा गडी भेटला. तशी भेट नागपूरच्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनात झाली. पण फोनवर बोलणं सरु होतं. कोळश्याचा खाणीचा संदर्भ सुरवातीला यासाठी दिलाय की कन्नोजे हे खाणीत काम करुन शेती करणारे कृषी पदविकाधारक शेतकरी आहेत.
काही लोकं प्रचंड धोरणिक असतात. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक वगैरे प्रकारचं वारं कधी कुठल्या दिशेला फोफावेल आणि त्यानुसार कशाचं मार्केट व संंबंधित लिंकेज कसे हालतील याचा अंदाज त्यांना बरोबर येतो. रियाजरावांचे वडील हे त्यापैकीच एक वल्ली. भविष्यात कोळशाच्या खाणीचा विस्तार होईल, त्यावेळी आसपासची जमिन अधिग्रहीत होईल, ती अधिग्रहीत झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना खाणधारक कंपनीच्या सेवेत समावून घेतले जाईल याचा अंदाज त्यांना कित्येक वर्षे आधीच आला. आणि त्यानुसार त्यांनी भिवापूर जवळील बेसूर गावी आठ एकर शेतजमिन घेतली आणि ठेक्याने म्हणजेच खंडाने किंवा भाड्याने दिली.
बेसर हे रियाज यांच्या मामाचं गाव. बारावी झाल्यानंतर रियाज शिवशंकर
कृषी विद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी बेसूला आले आणि कृषी शिक्षण घेता
घेता त्यांची शेतीची आवड वाढत गेली. मग ठेक्याने दिलेल्या जमिनीपैकी दोन एकर आपल्या हाती घेवून त्यांनी शेतीचा श्रीगणेशा केला. पहिल्या खरीपात 2 एकरात फक्त 3 पोती सोयाबीन झाले. इतर लोकांची त्यावेळी एकरात 10 पोती झालेली.
त्यानंतर कालव्याच्या पाण्याच्या आसऱ्यावर त्यांनी रब्बीत गहू व हरभऱ्याचे (चना)
उत्पादन घेतले. त्यात 13 पोती गहू आणि तीन पोती चना झाला. या यशाने त्यांची शेतीची
आवड आणखी वाढली आणि मग पुढच्या वर्षी त्यांनी शेती ठेक्याने द्यायचे बंद करुन सर्व
स्वतःकडे घेतली. आयडीबीआय बॅकेकडून साडेतीन लाख रुपये कर्ज
घेवून त्यांनी बोअरवेल घेतला आणि पाण्याची सोय करुन भाजीपाला उत्पादनाकडे वळले.
संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणली. मग हळहळू मेथी, वांगी, टोमॅटो, कारले, मिरची,
चवळी, फुलकोबी आदी भाजीपाला उत्पादन सुरु केले. शेतीची शैक्षणिक पार्श्वभूमी,
शेतातील काटेकोर कामाचा अनुभव आणि जोडीला स्थानिक शेतकरी गटातील तरुण मित्रमंडळीची
साथ या जोरावर उत्पादन वाढू लागले. यश मिळू लागले.
कापसाची लागवड त्यांनी 2012 पासून सुरु केली.
सहा एकरात एकरी 26 क्विंटल सरासरी उत्पादन मिळवले. सध्या पाच एकर कपाशी, चार एकर
चना आणि दोन एकरवर त्यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षी कन्नोजे यांची 10 जमीन वेस्टर्न कोल्डफिल्ड
या कोळशाच्या खाणीसाठी गेली. जमीनीच्या परताव्यासोबतच त्यांनाही कंपनीत नोकरी लागली. सध्या ते गावातच नोकरी
करता करता शेतीतही काटेकोरपणे प्रगती करत आहेत. एक पूर्णवेळ माणूस शेतीकामासाठी
ठेवला असून आवश्यकतेनुसार मजूरांकडून कामे करुन घेतात. कापूस आणि भाजीपाला उत्पादनात त्यांचा चांगला जम बसला आहे.
कापूस उशीराच्या पावसात सापडू नये म्हणून ते
मॉन्सूनला सुरवात होण्यापूर्वीच ठिबकवर 7 जूनपर्यंत लागवड करतात. पुर्वी 25 मे ला
रोवणी करायचे. हा बदल केल्याने कपाशीचे नुकसान होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे.
अशा पद्धतीने स्थानिक परिस्थितीनुसार बदल करत त्यांनी उत्पादनात सातत्य राखण्याची
हातोटी मिळवली आहे.
शेतकरी गट व मित्रमंडळीमार्फत त्यांचे गावात,
शेतात पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नाले, बंधारे, जलयुक्त
शिवाराची कामे सुरु आहे. कित्येक वर्षे कोरडवाहू शेती केल्यानंतर ओलिताच्या शेतीने
प्रचंड फरक पडतोय, हे लक्षात आल्यानंतर आता पाणी संचय व त्यातून ओलीताची शेती
समृद्ध करण्याकडे येथील तरुणांचा कल आहे. रियाज कन्नोजे यांना भाजीपाला व कपाशी
उत्पादनातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्य शासनामार्फत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
देवून गौरविण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment